Tuesday, May 29, 2007

खारूताई

University मध्ये Oakची झाडं खूप. एखाद्या माणसाच्या स्मरणार्थ ओकचे झाड लावण्याचा कार्यक्रम University राबवते. Live Oak Endowment Program. लाडक्या माणसाची आठवण "जीवंत" ठेवण्याची किती सुंदर कल्पना. ही ओकची झाडं छान छत्री सारखी गोल वाढतात. आणि त्यावर हमखास खारी खेळत असतात. ओकची पडलेली फळं गोळा करणं हा त्यांचा आवडता खेळ. ICE AGE पासून हाच खेळ चालू आहे.

इथल्या खारी त्यांच्या भारतीय बहिणीन्पेक्षा आकाराने जरा मोठ्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना खारूकाकू किंवा खारूमावशी म्हणतो. शिवाय त्या माणसांना सहसा घाबरत नाहीत. घाबरवण्याचा प्रयत्न केला तर आक्रमणाचा पवित्रा घेतात. आणखी एक फरक आहे.... त्यांच्या पाठीवर पट्टे नाहीत. म्हणजे त्यांच्यावर रामरायाची कृपा झाली नाही तर. कधीकधी विचार केला तर गम्मत वाटते. रामायण हे जर फक्त काल्पनिक काव्य / कथा असेल तर त्यातले भौगोलिक वर्णन एवढे अचूक कसे ? हनुमानाने दक्षिणेहून द्रोणागिरी पर्वत आणला आणि भारताच्या उत्तरेला समुद्रात रावणाची लंका होती अशीही कल्पना करता आली असती की ? म्हणजे वाल्मिकींचा भूगोल पक्का होता का ते इतिहास सांगत होते ? भारत आणि श्रीलंकेला जोडणार्‍या पुलाचे अवशेष आहेत म्हणतात. आता हेच पहा ना... पाठीवर पट्टे असणे ही केवळ भारतीय खारींची विशेषता आहे का ? मला माहित नाही. पण अमेरिकन खारींच्या पाठीवर बारकोड नसतो.

एकदा संध्याकाळी घरी येताना वाट चुकलो आणि हरवलो. वाटेत एका छोट्या खारीकडे लक्ष गेले. ती भारतीय खारी एवढी होती. जवळ गेल्यावर लक्षात आले की पिल्लू आहे. खारूताई थोडी गोंधळली होती. बहुदा ती पण हरवली होती. काहीतरी शोधत होती. ICE AGE मधल्या खारीसारखी Nut तर नसेल ना शोधत ? का आईला शोधते आहे ? मला "Mama Mama" करून TOMच्या मागे लागणार्‍या लहान पक्ष्याचे cartoon आठवले. त्या पक्ष्याला सांभाळतांना TOMचे झालेले हाल (कुत्रा सुद्धा खाणार नाही एवढे) आठवले. मी दोन पावलं मागे सरकलो. (Cartoon पहाणे जरा कमी केले पाहिजे).

"चूक चूक" करून तिला सहज बोलावलं. तिनेही चक्क कान टवकारून वर पाहिलं, आणि स्वत:हून जवळ आली. तिचे काळेभोर, पाणीदार आणि केविलवाणे डोळे हुबेहुब, SHREK मधल्या मांजरा सारखे दिसत होते. धडधडणारी इवलीशी छाती. कुतूहल, भिती आणि आशा असे संमिश्र भाव डोळ्यात एकवटून ती माझ्याकडे पहात होती. मी खाली बसून हळूच हात पुढे केला. तशी ती हाता जवळ येऊन वास घेऊ लागली. प्राण्यांनी आपणहून मैत्री करावी असे क्षण फारच दुर्लभ असतात. मी हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिची धडधड थोडी कमी झाली. (चला, हा प्राणी आपल्याला खाणार तरी नाही ) ती पळून नाही गेली याचे मला आश्चर्य वाटले. तिला काय हवं होतं हे मला कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवला. पाठीवर तीन पट्टे तर नाही उठले, पण मला मात्र रामानंद झाला.