Thursday, April 5, 2007

Mike

LSU मधला संध्याकाळचा क्लास संपवून घरी येताना एका बाजूला जरा गर्दी दिसली. (अमेरिकेत माणसांची गर्दी जरा दुर्मीळ गोष्ट आहे.) नवीनच होतो मी... कॅम्पसही पूर्ण पाहून झाला नव्हता. एका भल्यामोठ्या जाळीच्या मागे गर्दीच्या आकर्षणाचा केन्द्रबिंदू होता. ही भानगड तरी काय आहे ते पहायला पुढे गेलो तर वाघ... हो हो चक्क भारतीय वाघ! ह्या अचानक घडलेल्या दर्शनामुळे मला प्रचंड आनंद झाला. नवविवाहीत मुलीला, माहेरचा माणूस अचानक आल्यावर जेवढा आनंद होत असेल तेवढा. (इथे सत्तरीच्या दशकातली, सासूचा जाच सहन करणारी सून डोळ्यासमोर आणावी) अमेरिकेत रूळे पर्यंत,(डॉलर ते रूपये हे गणीत न घालता खरेदी करे पर्यंत.) दूरान्वयानेही भारताशी संबन्ध असणार्‍या गोष्टी पाहून मला भरून यायचे. पारले-जी चा पुडा पाहूनही भरून आल्याचे स्मरते. इथे तर साक्षात बंगाल टायगर समोर होता !

कॉर्बेट अभयारण्यात सफ़ारीसाठी गेलो होतो तेव्हा वाघ पहाण्याची फार इच्छा होती. पण तेव्हा आमच्या नशिबी फक्त मोर आणि माकडं एवढच होतं. मोर आणि माकडंही पहावीत. पण IIT कानपूर मध्ये कावळ्यांपेक्षा जास्त मोर आहेत. त्यांचं भरतनाट्यम् , मोहिनीअट्टम सगळं पाहिल्या नंतर ४० फ़ूट लांब चालणार्‍या मोराचे आकर्षण कसे राहिल ? माकडांचीही तिच कथा. तसं आम्हाला हत्ती, सांबर, हरिण, गरूड पण दिसले. तरी वाघोबा नाही. आम्ही फक्त वाघाच्या पाऊलखूणांचे जवळून फोटो काढले. ते develop झाल्यावर, " हत्तीच्या पायाचे ठसे", "Mount Everest वरचा अंधार" असल्या कुठल्याही नावाखाली खपले असते.

आज चक्क वाघ समोर होता, पण हातात कॅमेरा नव्हता. सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात ! ह्या वाघाचे नाव Mike. LSU चा Mascot. त्यामुळे LSU मध्ये सगळीकडे वाघोबाचं राज्य.

Identity card = Tiger card

Email account = PAWS account

Football team = LSU Tigers (American football)

buildings = Tiger Manor, tiger tower, Tigerland

Supercomputer = Mike

Photocopy/Printing center = Paw prints (Engg कॉलेजमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट.)

इथल्या लोकांना मराठी येत नाही ते बरं आहे, नाहीतर "वाघमारे", "शेरतूकडे" आडनावाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसता.

Mikeचे घर फ़ार छान आहे. छोटंसं डबकं, झाडं, छोटी टेकडी, अगदी जंगला सारखं. सुरक्षीततेची पण तेवढीच काळजी. Mikeशी ओळख झाल्यावर एक नवा छंदचं जडला. येता जाता त्याला पहाण्याचा, त्याच्याशी गप्पा मारण्याचा ( आजूबाजूला कोणी नसेल तर). तो काहीच बोलायचा नाही, पहायचा मात्र कुतुहलाने कधीतरी. तो झोपलेला असेल तर त्याला गुद्‍गुल्या करून उठवावेसे वाटे. Mike वाघ आहे हे मी काही दिवसांनी विसरून गेलो होतो..... तो ही विसरला होता बहुदा.

"Look big pussy cat. It is called tiger" म्हणत अमेरीकन आई Mike कडे बोट दाखवायची आणि मग दोन टपोरे डोळे , खेळणी, खाणं आणि रडणं सोडून Mike ला न्याहाळायचे. कधीकधी ते डोळे पहायला जायचो. कॅमेरा घेतला की Mike चे फोटो काढायाचे, video shooting करायचे असे ठरवलेच होते मी. कॅमेरा घेउन ३ महिने झाले पण मुहूर्तचं मिळत नव्हता. सुट्टीत करायचा प्लॅन केला शेवटी.

काल Mikeच्या घरावरून जाताना खूप गर्दी दिसली. पदवीदान समारंभ होता बजुच्या मैदानात. पण आज घरात Mike नव्हता. Mike गेल्याची बातमी सकाळीच वाचली होती. मला प्राण्यांचा फार लवकर लळा लागतो. आता मी त्या वाटेवरून जाणे टाळतो. फोटो काढायचेही राहून गेले. तेवढीच आठवण. जाता जाता हा मित्र एक धडा मात्र नक्की शिकवून गेला. -- Life is too short to be planned. सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.

हा Mikeचा मी काढलेला एकमेव फोटो.