Monday, April 21, 2008

नाच रे पोरा

आयुष्यात कधी स्टेजवर नाचावं लागेल असं मुळीच वाटलं नव्हतं. पण अचानक अनेक गोष्टी घडत असतात... तसाच एकदा नेहाचा अचानक फोन आला... "केदार, आम्ही या spring banquet मध्ये dance करणार आहोत... आणि तू आहेस त्याच्यात". काय सांगायचं या मुलींना ? काही ऐकूनच घेत नाहीत. सांगितलं की मी कधीही नाचाच्या फंदात चुकूनही पडलेलो नाही, लहानपणी गणपती विसर्जनात लेझीम केले होते तेवढच. "एक नंबर, लेझीम आहे आपल्या dance मध्ये.. बाकीचं आम्ही शिकवू." स्वतःच्या पायावर लेझीम मारुन घेतल्या सारखं वाटलं. पुढे आम्हाला ( मी आणि अमोल) भयंकर south Indian dance दाखवून brain washing करण्यात आले. मग आम्ही प्रयत्न करायच ठरवलं.

खरं तर मुलींची नाचामागची कल्पना मला आवडली होती. आमच्या spring banquet (ISA=Indian Student Asso. चा वार्षिकोत्सव ) मध्ये खूप दक्षिण भारतीय गाण्यांवरती नाच होतात. मग मराठी गाण्यावर नाच आपण का करू नये ? माझा या भूमिकेला पूर्ण पाठींबा होता पण त्यासाठी आपल्याला नाचावं लागेल असं वाटलं नव्हत. तीन आठवडे आधी पासून आम्ही नाचाचा सराव सुरू केला. त्यात गाणी निवडणं आणि नाच बसवणं हा पण भाग होता. अर्थात तो भाग मुलींनी केला... खरं तर सगळच मुलींनी केलं ... आम्ही लिंबू तिंबू. आमच्या सगळ्या teachers मात्र भारी आहेत

नेहा : कत्थक yellow belt

आकांक्षा : भरतनाट्यं brownbelt.

शिवानी : भरतनाट्यं blackbelt.

शिवानीने एकदा तिच्या अरंगेत्रम ची CD आम्हाला दाखवली होती. त्यात आम्हाला फारसं काही कळत नव्हतं. मला कधीच कळत नाही. सुरवातीला गोष्ट सांगतात तेव्हा कळतं, पण मग नाचात कृष्ण कधी आणि राधा कधी असा BMW होतो (basic मे वांदा ). म्हणून आम्ही शिवानीला सांगितलं की तू नाच जरा समजावून सांग. तर म्हणे "सगळं काय सांगायला लागतं ... तुम्ही जरा स्वतःचं इमॅजीनेशन वापरा ना ". मग आम्ही आमच्या कल्पनाशक्तीने अनेक तारे तोडले आणि त्याच मुद्रा आणि हाव भावातून कसा पुर्णतः वेगळा अर्थ काढता येऊ शकतो हे शिवानीला सिद्ध करून दाखवले. तेव्हा पासून तिने ती CD, "कोणालाच दाखवणार नाही " या निश्चयाने कुठेतरी लपवून ठेवली आहे.

आम्ही रोज रात्री साधारण २ तास सराव करायचो. त्यात माझा सगळ्यात नावडता भाग म्हणजे एकट्याने नाच करणे हा असायचा. कारण मला क्रमच लक्षात नाही रहायचा. सगळे एकत्र नाचताना आजूबाजूला बघून चालून जायच, पण एकट्याने करताना सागळ्या चुका पकडल्या जायच्या. मग अमोलने त्या सगळ्या dance steps वर एक मोठी गोष्ट गुंफली, तेव्हा कुठे क्रम आमच्या लक्षात राहू लागला. ही गोष्ट मुलींना फारच बावळट वाटायची, पण त्यात काय नवल. मुलींच्या काही गोष्टींचं मात्र आम्हाला फार नवल वाटायचं. उ.दा. त्या dance step एकमेकींना, नाच न करता, शब्दातून सुद्धा सांगू शकतात. म्हणजे असे

नेहा : अग, ती ढगाला लागली कळं मधली शेवटची step

शिवानी : हा, म्हणजे ही

झालं !!... ये ह्रदयी चे ते ह्रदयी पोहचलं पण !! आम्ही पायाला कळा येई पर्यंत नाचून सुद्धा आम्हाला ती step जमत नाही आणि इथे फक्त शब्दातून सगळ कळतं ! माणसांना बोलताना बघून माकडांना काय वाटत असेल ते त्या दिवशी जाणवलं. मुलींचा या बाबतीत अभ्यास जरा जास्तच असतो. माझ्या शाळेच्या reunion च्या वेळी, वर्षभर न भेटलेल्या मैत्रीणी, जे गाणं चालू असेल त्यावर नाचू लागतात. "तू शाहरूख खान मी प्रिती झिंटा " या एका वाक्यात त्यांचा पूर्ण नाच बसतो आणि रोज त्या गाण्यावर सराव करत असल्या सारख्या नाचतात. असो ... लांबून गाडी पाहून त्याचा मेक सांगू शकणारी मुलगी मला अजुन भेटायची आहे !

या नाचाच्या निमित्ताने शिकलेल्या काही गोष्टी :

१. नाच केल्यामुळे छान झोप लागते.

२. सगळ्या मुली जन्मताच dancer असतात.

३. नाचाच्या आदल्या दिवशी बॅडमिंटन खेळू नये. त्यामुळे पाय लचकून तुमचा शकुनी मामा होऊ शकतो.

४. एका गाण्याच्या dance steps दुसऱ्या गाण्यावर सहज बसतात.

The dance was well received by the audience. Heres the video