Wednesday, June 27, 2007

न्यूयॉर्क -१

NOTE : डिसेंबर २००६ मध्ये न्यूयॉर्क फिरायचा योग आला. माझी अमेरिकेतली पहिलीच सुट्टी. त्या वेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता. मी एक कामचलाऊ (use and throw) camera घेतला होता, पण त्यातले अर्धे फोटो कॅमेर्‍या बरोबरच फेकून द्यावे लागले. The images used below are not mine. Click on the images to see their enlarged versions and the source. I thank the photographers of these images for making their images public. Please see them in full size :)

भेट :

सागर आणि मी एकत्र न्यूयॉर्क फिरायचं ठरवलं. सागर - एकता विमानाने येणार होते आणि मी ट्रेनने न्यूयॉर्कला पोहोचणार होतो. भेटायचं कुठे ? मॅनहॅटनच्या दक्षिण टोकाच्या सब-वे स्टेशनवर (सागरच्या अभ्यासाचा निष्कर्ष). न्यूयॉर्क हे शहर मॅनहॅटन, क्वीन्स् , ब्रूक्लीन, ब्रॉन्क्स् ,सॅटन ह्या पाच बेटांनी बनले आहे. त्यातले मॅनहॅटन हे शहराचे ह्रदय. न्यूयॉर्क शहरात सब-वे (भुयारी ट्रेन)ची चांगली सोय आहे. बाकी अमेरिकेत गाडी नसेल तर आपण अपंग होतो. न्यूयॉर्कमध्ये तसली भानगड नाही. पण सब-वे सुद्धा काही कमी भानगडीची गोष्ट नाही. त्याबद्दल नंतर लिहीतो.

भेटायच्या स्टेशनाचे नाव "बॉलिंग ग्रीन". (हे नाव ऐकण्या आधी मला "कॉटन ग्रीन" हे हार्बर लाईन वरच्या स्टेशनाचे नाव फार विचित्र वाटायचे.) पण स्टेशनावर कुठे ? एवढा तपशील ठरवण्याचे कारण म्हणजे सागरकडे मोबाईल नव्हता. "एक नंबर प्लॅटफॉर्मवर इंडीकेटरच्या खाली" ही मुंबई मध्ये भेटण्याची जागा न्यूयॉर्कमध्ये चालेल का नाही ह्यात जरा शंका होती. प्लॅटफॉर्मवर इंडीकेटर असतो का नाही ?, जिजस्‌ जाणे ! शेवटी १ नंबर (किंवा तत्सम) प्लॅटफॉर्मच्या दक्षिण टोकाला भेटायचे ठरले. दक्षिण टोक गाठण्याचे कारण म्हणजे आम्ही प्रथम स्वातंत्र्य देवतेच्या दर्शनाला जाणार होतो, आणि त्यासाठी फेरी मॅनहॅटनच्या दक्षिण टोकावरून सुटते.

दुसर्‍या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो... असं माझ्याबाबतीत फार क्वचितच घडतं. मला दक्षिण टोक गाठायला १ तास उशीर झाला. सागरचा पत्ता नाही की फोन नाही. आता काय ? मलातर ह्या बॉलिंग ग्रीन स्टेशनाशिवाय काहीच माहिती नाही ! सागर भेटावा म्हणून मी स्वातंत्र्य देवतेची प्रार्थना करू लागलो. थोड्याच वेळात सागर आणि एकता येताना दिसले. (हुश्शऽऽऽऽ) त्यांच विमानही तासभर उशीरा आलं होतं.

Statue of Liberty

बॅटरी पार्क मध्ये statue of liberty ची तिकीटं मिळतात. Statue of liberty फ्रान्सने अमेरिकेला भेट दिला आहे. अमेरिकन स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही भेट देण्यात आली होती. पुतळा ठेवण्यासाठी मॅनहॅटनच्या दक्षिणेचे एक बेट निवडण्यात आले आणि त्यावर पुतळ्याच्याच उंचीचा चौथरा बांधण्याचे काम अमेरिकेने हाती घेतले. पुतळ्याचे वेगवेगळे भाग बोटीने अमेरिकेत पाठवण्यात आले. पुतळा पोकळ असून आतून वर जाण्याची सोय आहे. पूर्वी वर पर्यंत सोडायचे पण आता फक्त चौथर्‍यावर जाता येते. त्यासाठी सकाळी मोजकेच पास दिले जातात. आम्ही काही पास घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. शिवाय त्या चौथर्‍यावरून स्वातंत्र्य देवी अजून सुंदर दिसली असती असे मला तरी काही वाटत नाही. उलट, "मेणबत्ती(/मशाली) खाली अंधार" अशी परिस्थिती झाली असती. बॅटरी पार्कवर आमची कसून तपासणी करण्यात आली आणि आम्ही बोटीने "Liberty" बेटाकडे निघालो. मॅनहॅटन बोटीतून पहाताना फार छान दिसत होते. उंच उंच बिल्डींगी... अगदी ‘गगन चुंबी’... काही वेळा ढग खाली येतात किंवा धुकं असतं आणि इमारतींची टोकंच दिसत नाहीत. असं वाटतं लिफ्टने सरळ स्वर्गात जाता येईल.

Liberty बेटावर पुतळा आणि काही दुकानं एवढंच आहे. स्वातंत्र्य देवतेचे स्वातंत्र्य दर्शवणार्‍या तीन गोष्टी आहेत. मुगूट, मशाल आणि पायातली तुटलेली बेडी. हातात पुस्तक असून त्यावर अमेरिकन स्वातंत्र्याची तारीख रोमन आकड्यात लिहीली आहे. एवढा मोठा पुतळा बनवून तो भेट देण्याची कल्पना ज्याला प्रथम सुचली त्याबद्दल मनात प्रचंड आदर वाटू लागला.ती कल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या सर्वच लोकांची कमाल आहे. ते करण्यासाठी त्यांना अनेक सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक प्रश्नांना सामोरे जावे लागले असणार. त्यांच्या चिकाटीमुळे दगडातून स्वातंत्र्य देवी प्रकट झाली आणि नकळत माझे हात जोडले गेले. ही सगळी कहाणी त्या शिल्पकाराच्या तोंडून ऐकायला किती मजा येईल, असा एक विचार मनात डोकावून गेला.

बेटावरच्या sovenier shop मध्ये statue of liberty चे छोटे पुतळे, keychains, फोटो ह्यासारख्या गोष्टी विकत मिळतात. सोवेनीयर म्हणजे एखाद्या ठिकाणची किंवा व्यक्तीची आठवण सांगणारी गोष्ट. दुकानातच, स्वातंत्र्य देवतेच्या शिल्पकाराचा चालता बोलता पुतळा होता आणि तो तिच्या जन्माची कहाणी सांगत होता. त्या गोष्टीमुळे ते दुकान चांगलेच ‘आठवणीत’ राहिले. भेट वस्तु घेऊन आम्ही फेरीने Ellis Island साठी निघालो. मॅनहॅटन - लिबर्टी आयलंड - एलीस आयलंड - मॅनहॅटन अशा ह्या फेरीच्या फेर्‍या चालू असतात.

Ellis Island

ह्या बेटावर पूर्वी immigration (कायम स्वरूपी नागरिकत्व मिळण्याची प्रक्रिया) व्हायचे. आता इथे फक्त संग्रहालय आहे. हॅट आणि कोट घातलेली माणसं immigration च्या रांगेत उभी, त्यांच्या जुन्या काळच्या बॅगा, हे सर्व दर्शवणारे कृष्ण धवल फोटो आहेत. ते पाहताना जरा गंमत वाटते. बाकी तिथे फारसे पाहण्यासारखे काही नाही.

फेरीने मॅनहॅटनला येताच सागरने खिशातून एक मोठ्ठा नकाशा काढला. त्यावर प्रेक्षणीय स्थळं ठळक केली होती. मॅनहॅटन हे शहर पायीच फिरायला मजा आहे. तरी आम्ही दिवस भराचा सब-वे चा पास काढला होता. मुंबईकरांना रेल्वेचे आकर्षण असतेच ! पण सब-वे च्या दाराला लटकता येत नाही याचं दोघांनाही दुःख झालं.

Ground zero

उंच उंच इमारतींच्या जंगलात अचानक सपाट भाग. ११ सप्टेंबर २००१ ला world trade center चे twin towers जमीनदोस्त झाले ती ही जागा. आजही शहराच्या गडबडीत मनाला सुन्न करून जाते. आता इथे त्या घटनेची आठवण सांगणारे छोटे स्मारक आहे. बिल्डींग पडतानाचे फोटो आहेत. आजूबाजूला मोटारींची ये-जा चालू असते, खाली सब-वे धडधडत असते. पण या ठिकाणी एक वेगळी शांतता जाणवते. पुन्हा अशी घटना कुठेही न घडो हीच प्रार्थना.

वाटेत आम्हाला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेन्जचा बैल दिसला. ट्रिनिटी चर्च पाहिलं. twin towers पडताना त्यातील काही भाग जवळच्या एका स्मशानातील कबरींवर पडला. तिथल्या एका झाडावर पडून ते मेलं, आणि खालच्या कबरी वाचल्या. त्या झाडाची मुळं रंगवून ट्रिनिटी चर्च बाहेर ठेवली आहेत. अमेरिकन लोकांना इतिहास सांगण्याची आणि जपण्याची फार हौस. वास्तविक भारताचा इतिहास अमेरिकेपेक्षा जास्त प्राचीन व रोमहर्षक आहे. पण तो जपण्याच्या बाबतीत भारत उदासीन आहे. अमेरिकेत प्रत्येक झाडाचा, चर्चचा, बिल्डींगीचा इतिहास सांगणार्‍या पाट्या असतात. एवढंच कशाला ? साधा ब्रेड आणि मीठ यांचाही इतिहास चवीने सांगितला जातो. उदाहरणादाखल मिठाच्या डब्यावर अशा पद्धतीत इतिहास छापलेला दिसतो.

आमची कंपनी १९२८ साली स्थापन झाली. तेव्हा पासून आम्ही, खास तुमच्यासाठी, उत्तम दर्जाचे मीठ बनवत आहोत. कंपनीचा लोगो बनवण्याचं काम त्या काळचे प्रसिद्ध चित्रकार Sir William ह्यांना देण्यात आले. पण त्यांना बरेच दिवस काही सुचेना. एकदा बागेत बसलेले असताना त्यांना छत्री घेऊन जाणारी एक तरूणी दिसली. त्यांनी लगेच तिचे चित्र रेखाटले. तिच्या हातात कंपनीच्या मीठाचा डबा दाखवला. (नाहीतर पावसात छत्री घेऊन जाणार्‍या मुलीचा आणि मीठाचा संबंध काय ?) त्यातले मीठ सांडत आहे असेही दाखवले. ह्या लोगो मुळे लगेच मीठाचा खप वाढला. पण ती तरूणी कोण होती हे काही कळेना. म्हणून कंपनीने "look alike" स्पर्धा चालू केली. ही स्पर्धा आजही दर पाच वर्षांनी घेण्यात येते.....

दुसर्‍या बाजूस मुलीचे चित्र आणि खाली कंपनीचे ब्रीदवाक्य - "जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमचे मीठ सांडते" (when it rains it pours)...

हे शब्दशः भाषांतर नसले तरी ह्यात मीठ मसाल्याचा भाग फार कमी आहे. सांगण्याचा मुद्दा हा की इतिहासाला अमेरिकन माणसाच्या अयुष्यात मीठा एवढेच महत्त्व आहे.

मॅनहॅटन मध्ये सर्व प्रकारची वाहनं पहायला मिळतात.(कॉलकत्याला competition आहे.) सायकल रिक्षा, बस, टॅक्सी, सब-वे, केबल कार. त्यात प्रवाशांसाठी खास ,छत नसलेली, hop on hop off बस लक्ष वेधून घेते. घोडागाडी तेवढी दिसत नव्हती. न्यूयॉर्कचे public transport फार छान आहे. रोज कामाला येणारी बरीच माणसं स्वतःच्या गाडी ऐवजी बसने किंवा सब-वे ने येतात. कारण मॅनहॅटन मध्ये parking चा बराच त्रास असतो. नाहीतर अमेरिकन माणूस प्रत्येक ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन जाणं पसंत करतो. अगदी कचरा टाकायलाही तो स्वतःच्याच गाडीतून जातो !

Brooklyn Bridge:

मॅनहॅटन आणि ब्रुक्लींन बेटांना जोडणारा हा फार जुना ब्रिज. वहनांसाठी तीन पदरी मोठे रस्ते आणि मधोमध चालण्यासाठी लाकडी रस्ता. चालण्याचा रस्ता, गाड्यांच्या रस्त्यापेक्षा थोड्या उंचीवर आहे. मॅनहॅटन हे नदीतले बेट- पश्चिमेला हडसन तर पूर्वेला ईस्ट हडसन नदी वहाते. ब्रुक्लींन ब्रिज ईस्ट हडसन नदीवर आहे. एकोणीसाव्या शतकातले गोथीक architecture चे दगडी बांधकाम, नदीच्या दोन्ही बाजूला उंच दगडी मनोरे आणि त्यातून निघणार्‍या लोखंडी दोर्‍या- इंजिनीयरिंगच्या पुस्तकावरचे चित्र जिवंत झाल्या सारखे वाटते.

आता अंधार पडू लागला होता. सात वाजल्यासारखे वाटत होते, पण खरं तर संध्याकाळचे पाच वाजले होते. ब्रुक्लिनचे मोठे city clock वेळ सांगत होते. आकाशात रंगांची उधळण चालू होती. नदीतील बंदरं झगमगत होती. शहरातही दिवे लागणी चालू होती. Empire state इमारतीच्या मुगुटाचा हिरवा रंग, Chrysler इमारतीचे नक्षीकाम लक्ष वेधून घेत होते. नदीला समांतर असलेले, दिव्यांची माळ घातलेले रस्ते मरीन लाईन्सची आठवण करुन देत होते. उत्तरेला ब्रूक्लींचाच नवीन ब्रिज ऐटीत उभा होता. कोट, टाय, हॅट घातलेल्या माणसाशेजारी एखाद्या टी-शर्ट जीन्स घातलेल्या मुलाने उभं रहावं तसा. नवीन ब्रिज वरुन सब-वे सुद्धा जात होती. दोन्ही ब्रिज वाहनांनी भरून वाहत होते आणि खाली ईस्ट हडसन नदी. संध्याकाळी फेरी मारायला, पळायला, सायकलिंग, स्केटींग करायला ब्रुक्लींग ब्रिज हे ब्रुक्लीनवासीयांचे आवडीचे ठिकाण आहे. आम्हाला (हळू हळू) ब्रिज पार करायला एक तास लागला. ब्रुक्लींन वरून (खरं म्हणजे खालून) सब-वे पकडून परत मॅनहॅटनला आलो. ही सब-वे पकडायला तीन मजले खाली जावे लागते आणि सब-वे नदीच्या खालून मॅनहॅटनला येते. म्हणजे आम्ही नदीला प्रदक्षिणा घातली की ! वरून ब्रुक्लींन ब्रिज आणि खालून सब-वे.

Times Square म्हणजे मॅनहॅटनमधला एक महत्त्वाचा चौक. इथे Newyork Timesचे कार्यालय होते म्हणून हे नाव पडले. हा चौक आपल्या जाहिरातींच्या झगमगाटासाठी प्रसिद्ध आहे. बिल्डींगींच्या भिंतींवर २-३ मजली उंच स्क्रीन आहेत आणि त्यातून सतत जाहिरातींचा मारा सुरु असतो. मॅनहॅटन शहराची आखणी फार शिस्तबद्ध आहे. पट्टीने आखल्यासारखे, उभे आणि आडवे रस्ते आहेत. उभ्या (उत्तर दक्षिण) रस्त्यांना avenue तर आडव्या रस्त्यांना street म्हणतात. Times sq जवळच "मॅडम क्रूसाड" हे wax museum आहे.त्यात खर्‍या माणसांसारखे हुबेहूब मेणाचे पुतळे प्रदर्शनासाठी ठेवलेले असतात. मॅनहॅटन मधला प्रत्येक चौक बोलका आहे. प्रत्येक चौकात, प्रत्येक इमारतीखाली काहीतरी कलाकृती दिसते. प्रत्येक इमारतही वेगळी आहे. "चौकोनी ठोकळे" हे विशेषण कुठल्याच इमारतीला लागू होत नाही. सध्यातर christmas असल्यामुळे सजावटीला आणखीनच बहर आला होता.

Christmas:

जांभळ्या लाईटने उजळलेली एक उंच इमारत - Rockefeller - रोकोफेलर खाली christmas चे प्रमुख आकर्षण Christmas tree उभारण्यात आले होते. आणि ते पहायला खूप गर्दी जमली होती. संध्याकाळी अंधेरी ब्रिजवर असते तेवढी! झाडावर रंगीबिरंगी दिवे लावले होते, एवढे की झाडाची पानं सुद्धा दिसत नव्हती. झाडही चांगलं मोठं निवडलं होतं. (हो ते सांगायचं राहिलंच. हे झाड इथे उगवलेले नाही. दर वर्षी एक नवीन झाड निवडून इथे आणण्यात येते.) समोरच्या इमारतींवर पांढर्‍या शुभ्र चांदण्या चमकत होत्या. चर्चच्या ऑर्गन आणि bells वरचे सुंदर संगीत चालू होते. आजूबाजूच्या इमारतींवरून वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे प्रकाशझोत रोकोफेलरची सुंदरता वाढवत होते. झाडाच्या एक मजला खाली मोठे Ice skating rink होते. त्यावर लहान मोठी अशी सगळी मंडळी स्केटींगचा आनंद घेत होती.

Christmas ची अजून एक आठवण म्हणजे एका मॉल मध्ये ऐकलेला live piano. मॉलच्या मध्यभागी हा पियानो वादनाचा कार्यक्रम चालू होता. एक म्हातारेसे आजोबा तो वाजवून सगळ्यांच मनोरंजन करत होते. खराखुरा पियानो ऐकावा ही माझी इच्छा या वर्षी नाताळबाबाने पूर्ण केली. काही वेळानी आजोबांनी सर्व लहान मुलांना बोलावून प्रत्येकाला एक ताल वाद्य दिलं. पियानोतून "jingle bell jingle bell" चे सूर ऐकताच मुलांनी बरोबर ताल धरला. ते गाणं सर्वात जास्त टाळ्या घेऊन गेलं.

Grand Central

सबवे म्हणजे न्यूयॉर्कच्या खाली खणलेले एक शहरच. सबवे चे जाळे पूर्ण मॅनहॅटन खाली पसरलेले आहे. शिवाय ती नदीखालून, पुलावरून आजुबाजुच्या बेटांनाही जोडलेली आहेच. सबवेमुळे मॅनहॅटन मध्ये फिरणे (आणि हरवणेही) फार सोपे आहे. जागोजागी बोर्ड आहेत पण समजायला वेळ लागतो. इंजिनीयरींच्या भाषेत सांगायचे तर, 2D प्रोब्लेम मधून 3D प्रोब्लेम मध्ये जाताना जो गोंधळ होतो तोच गोंधळ Western railway ते NYC-सबवे जाताना होतो. सबवे मधून रस्त्यावर आले की दिशांचा गुंता होतो आणि मग धृव तारा शोधण्यापासून सुरुवात करावी लागते.

Grand Central हे सबवे आणि इतर रेलगाड्यांना जोडणारे स्टेशन. स्टेशन नावाप्रमाणेच "ग्रॅन्ड" आहे. आत बरीच दुकानं, हॉटेल्स‌ आहेत. शिवाय एक प्रचंड मोठा हॉल आहे. हॉलच्या छपरावर रात्रीचं आकाश रेखाटलेले आहे. सहा राशी, मृग नक्षत्र यांची काल्पनिक चित्रं असून त्यातल्या तारांच्या ठिकाणी दिवे लावले आहेत. डिसेंबर महिनाभर त्या हॉलमध्ये "कलायडोस्कोप" हा कार्यक्रम होता. दर अर्ध्या तासांनी दहा मिनीटांचा शो. मोठ्या घंटानादाने कलायडोस्कोप सुरू झाला. अनेक फिरत्या दिव्यांनी हॉलचे छत, भिंती आणि मोठ मोठे खांब नक्षीकामाने भरून टाकले. साथीला सुंदर ऑर्केस्ट्रा होता, चार्ली चॅप्लीन च्या सिनेमाच्या पार्श्वसंगीतात असतो तसा. संगीत आणि दिव्यांची हालचाल यांचा ताळमेळ मस्त जमला होता. हळूहळू नक्षीकामाची जागा शहराच्या चित्रांनी घेतली. टॅक्सीची रांग, उंच उंच इमारती, एम्पायर स्टेट, क्रायस्लर, सबवे, टाईमस्‌ स्क्वेअर ही चित्र भिंतीवर project होऊ लागली आणि छत रुपी आकाशात चांदण्यांची पकडापकडी चालू होती. दहा मिनीटांनी पुन्हा घंटानाद झाला आणि दिवे मावळले. कलायडोस्कोप मध्ये सबवेच्या जाहिराती पेक्षा जास्त शहराचा अभिमान झळकत होता. मला स्वतःला ग्रॅन्ड सेन्ट्रल स्टेशन फार आवडले. यापुढे कधीही "रेल्वेस्थानकावर एक तास" हा निबंध लिहिण्याची वेळ आली तर मी ग्रॅन्ड सेन्ट्रल स्टेशन निवडणार हे निश्चीत.

Statue of Liberty

Brooklyn Bridge

Times Square

Grand Central

No comments: