Thursday, December 1, 2011

आग्रा (भरतपूर दिल्ली)

संदीपच्या लग्नाची तारीख ठरली आणि भरतपूरला जायचा प्लान , जो अनेक महिने डोक्यात शिजत होता, तो वाडग्यात पडला. नोव्हेंबर महिना हा भरतपूर मध्ये पक्षी निरीक्षणासाठी उत्तम असल्याने लागोलाग ट्रेन, हॉटेलची तिकीट बुक झाली. दिवाळीच्या फराळाची शिदोरी घेऊन ३१ नोव्हेंबरच्या सकाळी, हरिद्वार superfast express ने, प्रवासाला सुरुवात झाली.

सामान जागेवर लावून बर्थवर स्थिरस्थावर होईपर्यंत लक्षात येऊ लागलं कि बोगीमध्ये एकूणच वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे. आमच्या सोबतही तीन पंजाबी आज्या आणि त्यांचे अनेक खाऊचे डबे होते. आल्यापासून त्यांची तोंडं चालूच होती - खाण्यात आणि बोलण्यात! गाडी पकडण्याच्या धास्तीमुळे पहाटे लवकरच उठलो होतो, त्यामुळे आम्ही ताणून देणं पसंत केलं. गाडीला pantry नसल्याचा शोध लागला. आज्या regular travellers असल्याने त्यांना हे माहिती होते. मग त्यांनी पहाटे चार ला उठून कसा स्वैपाक केला याची खमंग गोष्ट ऐकायला मिळाली. "एक दिन बहार जाना है तो कितना सोचा, कितना किया. और भगवान के पास हमेशा के लिए जाना है तो हम कुछ नहीं सोचते, कुछ नहीं करते " असे धार्मिक तात्पर्य सुद्धा होते.

नाशिकला थोडी गडबड ऐकू आली. Sideberth पडून एका आजीच्या डोक्याला जखम झाली होती, रेल्वेचा पांढरा napkin रक्ताने माखला होता. हे दृश्य बघून आम्ही ताबडतोब आमच्या first aid kit सकट कामाला लागलो. रक्त थांबवून ड्रेसिंग केलं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. आता त्या आज्या आमच्याकडे, धर्मग्रंथात वाचलेले हेच का ते देवदूत अशा नजरेने पाहायला लागल्या. त्या नजरा आम्हालाही कुठेतरी सुखावून गेल्या आणि first aid kit घेतल्याबद्दल आम्ही स्वतःची पाठ थोपटून घेतली. या प्रसंगानंतर आमच्या रात्रीच्या जेवणाचे contract आज्यांनी आपल्याकडे घेतले. कश्मिरा डॉक्टर असल्याची वार्ता आजुबाजुला पसरली आणि गाडीत तिचे मोबाइल क्लिनिक चालू झाले. त्याची परतफेड म्हणून प्रत्येकजण काहीतरी खायला आणून देत होता. pantry नसलेल्या गाडीमध्ये आमची खाण्याची रेलचेल चालू होती. एकूण प्रवास मजेत झाला.

पहाटे चारला पोहोचणारी गाडी साडेतीनलाच आग्र्यामध्ये हजर झाली. रिक्षाने हॉटेल Alpine मध्ये पोहोचलो. हवेत सुखद गारवा होता. हॉटेलमध्ये थोडीशी विश्रांती घेउन सूर्योदयाला ताजमहाल पाहायला निघालो. आमचा google map हॉटेल ताजमहालपासून दीड किलोमीटरवर असल्याचे दाखवत होता. एवढ्या अंतरासाठी रिक्षावाला पन्नास रुपयांवर हटून बसला. सकाळी सकाळी वाद नको म्हणून आम्हीही त्याच्यापुढे शरणागती पत्करली. पण ताजमहालच्या आसपासच्या एक किलोमीटर परिसरात प्रदूषण विरहित वाहनांनाच परवानगी असल्यामुळे केवळ अर्ध्या किलोमीटर साठी त्या पठ्ठ्याने आमच्याकडून एवढे पैसे उकळले. थोड्याच वेळापूर्वी स्टेशन पासून दहा किलोमीटर वर असणाऱ्या आमच्या हॉटेल वर आम्ही शंभर रुपयात आलो होतो. पण काय करणार 'अडला हरी...'! पुढच्या एक किलोमीटर साठी टांगेवाले आणखी पन्नास रुपये मागू लागले. शेवटी आग्र्याच्या रिक्षांमधून सुटका करून आम्ही पुढे चालत जायचा निर्णय घेतला.

तिकीट काढताना audio guide नावाची गोष्ट असते हे समजले. नाहीतरी आम्हाला guide चि लुडबुड नकोच होती पण माहिती तर हवी होती. त्यासाठी audio guide चा पर्याय उत्तम होता. सत्तर रुपये भाडे देउन मोठ्या उत्साहाने आम्ही तो घेतला. हे प्रकरण वापरायला खूपच सोपे निघाले. एक MP3 player, headphone आणि एक नकाशा आमच्या हातात सोपवण्यात आला. नकाश्यात दाखवलेल्या ठिकाणी उभे राहून तिथला क्रमांक दाबला की त्या ठिकाणाविषयी माहिती ऐकू यायची. मस्त ना!! . आमच्याकडच्या mobile चा headphone पण आम्ही वापरत असल्याने दोघांना एकत्र माहिती ऐकता येत होती.

electric golf car मधून ताजमहाल पर्यंत जायची सोय सरकारने वीस रुपयात केली आहे हे कळल्यावर चालत जायचा विचार सोडला. सुरक्षा सोपस्कार आटपून आत पोहचलो. मधला दिवस असूनही एव्हढ्या पहाटे पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळचे fog का smog होते. पहायला आलेल्यान पैकी पन्नास टक्के जनता परदेशी होती. ताजमहाल पाहिला = भारत पाहिला, असे समीकरणच असल्याने प्रत्येक परदेशी प्रवासी हा इथे येणारच. आग्र्या मध्ये International airport असायला हवा. असो ...

मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि, ताजमहालचे iconic दर्शन झाले. मधला कारंज्याचा पट्टा, भोवताली बागा, आणि दूरवर दिसणारी ती मिनारांनी वेढलेली सुंदर पांढरी शुभ्र इमारत, हे ताजमहालचे मनात ठसलेले रूप डोळ्यासमोर साकार झाले. आम्ही दोघांनीही आधी ताजमहाल पहिलेला असल्यामुळे त्याच्या भव्यतेची आधीच कल्पना असूनही, दोघेही त्याच्या दर्शनाने काही काळ स्तब्ध झालो. माहिती देणारा audio guide सोबत होताच. त्याच्या साथीने परिसराचा आस्वाद घेत फिरत होतो. इतिहास, भूगोल, स्थापत्यकला अशा विविध द्रीष्टी कोनातून तो ताजमहाल चे दर्शन घडवत होता. फक्त त्यातले हिंदी शहाजहानच्या काळातले (उर्दूमिश्रित) असल्यामुळे समजायला थोडे अवघड जात होते.

जसजसे त्याच्या जवळ जात होतो तसतशी त्याची भव्यता मनावर ठसत जात होती. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात रंगीबेरंगी दगड बसवून केलेले नक्षीकाम इतके सुबक आहे की ते रंगवल्याचा भास होतो. आतल्या कबरीच्या भोवतालचे नक्षीकाम तर अजोड आहे. त्यात वापरलेल्या दगडांचे रंग तर केवळ अप्रतिम आहेत. त्यांच्याभोवती कितीही फिरले तरी समाधान होईना. इथे फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे, डोळेभरून हे सौंदर्य मनात साठवले. चारही बाजूनी समान असणाऱ्या या वस्तूच्या symmetry ला छेद देणारी एकच गोष्ट म्हणजे इथली शहाजहानची कबर. ताजमहालच्या मूळ योजनेत तिचा समावेश नसल्याचे यावरून सिद्ध होते.

त्यानंतर इथल्या संग्रहालयाला भेट दिली. इथे ताजमहालाच्या plan चे blueprints, नक्षीकामाचे नमुने, त्यासाठी वापरलेले रंगीत दगड, आणि शहाजहानची त्या काळी रेखाटलेली चित्रं आहेत.
संध्याकाळी पुन्हा ताजमहालच्या भेटीला यायचंच असा निश्चय करून मागे फिरलो. audio guide म्हणत होता, "जाते जाते फिर एक बार मुडकर इस बेजोड कलाकृती को जरूर निहारीये" .

audio guide परत करताना एक कल्पना मनात आली. audio guide android application बनवण्याची. म्हणजे काहीसे असे... ताजमहालचे app download करायचे. downloading charges Rs 30.... GPS वरून smartphone ला कळणार कुठली mp3 play करायची ते. (शिवाय manual option सुद्धा असेल). त्यामुळे hardware investment आणि maintainence ची कटकट नाही, शिवाय मनुष्यबळ सुद्धा कमी लागणार. त्यामुळे ग्राहक्कांना आपण निम्म्या किमतीत तीच सोय पुरवू शकू. पर्यटकस्थाना बाहेर मोठी जाहिरात मात्र हवी. कशी वाटली कल्पना ? कोणी ह्यावरून कंपनी काढली तर मला royalty द्यायला विसरू नका !

बाहेर आलो आणि आपल्याला एक पोट आहे आणि ते सद्धया रिकामी आहे याची जाणीव झाली. ताजमहालच्या पुढचा टप्पा होता- लाल किल्ला. रिक्षावाले मागे लागलेच. किल्ल्यापर्यंत पोहोचायला पुन्हा पन्नास रुपये, पण आधी हॉटेल मध्ये जेवून किल्ल्यावर जायचे मात्र तीस रुपये सांगू लागले, अगदी मधल्या waiting सकट. अर्थात हॉटेलवाल्यांकडून यांना काहीतरी कमिशन मिळत असणार. म्हणून हा special discount!! त्याने ज्या हॉटेल वर आम्हाला नेले ते दिसायला यथातथाच असले तरी जेवण मात्र चविष्ट मिळाले. पुढे भरतपुरला जायच्या गाडीची सोयही या रीक्षावाल्याच्याच कृपेने झाली आणि आता निश्चिंत मानाने आम्ही आग्रा किल्ला बघायला निघालो.

किल्ल्याबाहेरच्या चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने 'आग्र्याहून सुटकेची' आठवण करून दिली. आग्रा किल्ल्यावरही audio guide ची सोय होतीच. आग्रा ही अनेक वर्ष मोगलांची राजधानी असल्यामुळे किल्ल्याचा विस्तार बराच मोठा आहे. संपूर्ण किल्ल्याभोवती खंदक (moat )आहे. तसेच शत्रूने चढाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला हत्ती घोडे अशा लवाजम्यासह आत शिरणे कठीण व्हावे म्हणून अरुंद प्रवेश मार्ग तसेच शत्रूंवर उकळते तेल टाकण्यासाठीच्या छुप्या जागा अश्या सुरक्षिततेच्या योजना इथे आहेत. अनेक दरवाजे, इमारती आणि दालनांचा किल्ल्यात समावेश आहे. त्यातला जहांगिरी महाल, औरंगजेबाचा दगडी bathtub, अंगूरी बाग या गोष्ठी विशेष लक्षात राहिल्या. औरंगजेबाचा दगडी bathtub म्हणे तो लढाईच्या ठिकाणी बरोबर नेत असे. आता त्याभोवती कुंपण बांधले असूनही त्यावरून चढून फोटो काढण्याचा आचरटपणा चालला होता. बघून कीव आली. ताजमहाल सारखाच हा किल्लादेखील यमुनेच्या काठी बांधला आहे. त्यामुळे इथे फिरत असताना पलीकडच्या काठावरून ताजमहाल सतत आपली सोबत करत असतो. आग्रा किल्ल्याचा विस्तार प्रामुख्याने शहाजहानच्या काळात झाला. पण विरोधाभास हा कि त्याच्या वृद्धापकाळात औरंगजेबाने त्याला इथेच कैद करून ठेवले होते. कैदेतून ताजमहाल दिसत राहावा एवढी सोय मात्र होती! audio guide च्या सोबतीने किल्ला पाहायला आम्हाला तब्बल तीन तास लागले.

थंडीचे दिवस असल्यामुळे सूर्यास्त साडेपाचलाच होणार होता. सूर्यास्ताच्या वेळचा ताजमहाल पाहायला लगबगीने निघालो. सकाळचे smog आता विरलेले असल्यामुळे Camera आणि डोळे यांना आता तो दुरूनही स्वच्छ दिसत होता. मावळतीकडे झुकणाऱ्या सूर्याच्या सोबतीने संगमरवराच्या रंगांच्या छटा बदलत होत्या. सकाळपेक्षा आता पर्यटकांची गर्दी अधिक जाणवत होती. पुन्हा एकदा मनसोक्त photography करून आम्ही हॉटेल कडे परतलो.

दुसऱ्यादिवशी सकाळीच काल ठरवलेल्या गाडीने भरतपूर कडे निघालो. वाटेत फत्तेपूर सिक्री ला भेट दिली.ही वास्तू सरकारच्या अखत्यारीत नसून खाजगी आहे. स्वच्छता आणि देखरेख मात्र सरकारीच वाटत होती. एकूण आजूबाजूच्या परिसरात बऱ्यापैकी घाणीचं साम्राज्य होतं.
इतिहास - अकबराला हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन अश्या तीन बायका होत्या. पण पुत्रसौख्य मात्र नव्हते. फत्तेपूर सिक्री मधल्या सलीम चिस्ती नावाच्या पीर बाबाच्या दुवेने म्हणे त्याला मुलगा झाला. त्या मुलाचे नावही सलीम ठेवण्यात आले. पुढे तो जहांगीर या नावाने गादीवर बसला. मुलगा झाल्याच्या आनंदात अकबराने सलीम चीस्तीसाठी बांधलेली इमारत म्हणजेच फत्तेपूर सिक्री.

इथला लाल दगडातील बुलंद दरवाजा हा आशियातील सर्वात मोठा ऐतिहासिक दरवाजा आहे. आतमध्ये सलीम चीस्तीची कबर आहे. त्या भोवतालच्या संगमरवरी भिंतींवर अतिशय सुंदर जाळीदार नक्षीकाम केलेलं आहे. अश्या प्रकारच्या नक्शीकामासाठी आजही फत्तेपूर सिक्री अग्रस्थानी आहे. अकबरासारखीच आपलीही मन्नत पूर्ण करण्यासाठी इथे लोक जाळीदार भिंतींवर धागा बांधतात. इच्छा पूर्ण झाल्यावर म्हणे धागा सोडायला देखील येतात!

इथून पुढे उत्तरप्रदेशची हद्द ओलंडून अवघ्या वीस किलोमीटर वर असणाऱ्या भरतपूरमध्ये पोहोचलो.
क्रमशः

No comments: